बालाजी वारी एक अमृतानुभव

 *बालाजी वारी...             एक अमृतानुभव....!*


श्रावणाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती बालाजीच्या वारीची....बालाजीची श्रावण वारी म्हणजे तमाम नाशिककरांसाठी एक मोठी आनंद पर्वणीच...या पर्वणीत दुमदुमतो तो निस्सीम भक्तीतून व्यक्त होणारा....       गोविंद नामाचा गजर....!!_

वारीमय झालेले हजारो वारकरी जेहान सर्कल ते बालाजी मंदिर हा सहा किलोमीटरचा रस्ता तुडवत परमात्मस्वरूप बालाजीच्या दर्शनाला  जातात..., आणि हा अनुपम सोहळा तमाम नाशिककर तल्लीन होऊन पहातात....

वारीच्या नियोजनकर्त्या टीमचे कौतुक काय आणि किती करावे...,एरवी दररोज "सू-र्य-वं-शी" असणारी ही मंडळी,श्रावण शुक्रवारी मात्र शुचिर्भूत होऊन भल्या सकाळी वारीच्याप्रस्थान स्थानी पोहोचून नियोजनात गर्क झालेली दिसतात...., कुठे ही,काही ही कमी पडू नये यासाठी त्यांचा अट्टहास सुरू असतो...,

महिलांची धावपळ तर विचारूच नका...

सगळं आवरून वारीसाठी वेळेवर पोहोचण्याची त्यांची पळापळ आणि आटापिटा,पाहून ऑलिम्पिक विजेत्या धावपटूना ही हेवा वाटावा....!

"श्री निवासा गोविंदा,     श्री व्यंकटेशा गोविंदा,     गोविंदा हरि गोविंदा,      गोकुल नंदन गोविंदा..."

चा जयघोष करत जेहान सर्कल येथून बालाजी मंदिराच्या दिशेने निघालेल्या या वारीत आता नाशिकच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने "वारकरी" सहभागी होऊ लागले आहेत...आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहेऱ्यावरचा भक्तीभाव..आनंद.. आणि गोविंद दर्शनाची आस...चित्रबद्ध करण्यासाठी छायाचित्रकाराची कौशल्यपूर्ण धडपड...प्रत्येक क्षण..., आणि त्या क्षणाची महती टिपण्याचा त्यांचा प्रयास...निव्वळ कौतुकास्पदच...!

जसजसे बालाजी मंदिर दृष्टीपथात येऊ लागते...तसतशी वारकऱ्यांची पावले अधिक गतिमान होऊ लागतात....अखेरच्या टप्प्यात तर ही गतीशिलता,चढाओढीत केव्हा परिवर्तित होते याचा अदमास आयोजन कर्त्यांनाही येत नाही...,

पळा पळा कोण पुढे पळे तो...अशी काहीशी अवस्था होऊन जाते....!!

इकडे मंदिराचे प्रांगण..., आणि सभामंडप...अलौकिक अशा सुमधूर स्वर वर्षावाने न्हाऊन निघालेले असते...त्या स्वर वर्षावाने अवघे वातावरण पुलकित होऊन निव्वळ भाव आणि भक्तीचा सुगंध दरवळलेला असतो..., आता लक्षात येतं की, वारकऱ्यांची धावपळ आणि चढाओढ ही या भक्तीरसाचा आनंद लुटण्यासाठी असते ती...!!_

एव्हाना गर्भगृहाच्या बंद दरवाजाआड भगवान बालजींचा मस्तकाभिषेक  सुरू असतो...                   आणि इकडे..... सभामंडपात दाटीवाटीने पण तितक्याच शिस्तीने हजारो भाविक भक्तिरसाच्या वर्षावात तल्लीन झालेले असतात, त्याचवेळी वारीचा अविभाज्य भाग बनलेला,आणि एकत्वाची भावना दृढ करणारा " तिलक " प्रत्येकाच्या भाळावर रेखाटण्याची सेवा तत्परतेने सुरू असते...तर दुसरीकडे आयोजकांकडून नम्र सूचनांचे निवेदनही सुरू असते....

काही क्षणातच शंखनादाच्या मंगलध्वनी मध्ये....मखमली पडदा बाजूला सरतो...आणि.....गर्भगृहाचे सुशोभित दरवाजे अलगदपणे उघडले जातात... षट समई दिपांच्या मंद प्रकाशात..,विविधरंगी पुष्पमाला,तुळशीहार व स्वर्णालंकारमंडित भगवान बालाजींचे लोभसवाणे प्रसन्न रूपदर्शन होते....

अन तत्क्षणी सभामंडपातील हजारो हात अभावितपणे अवकाशाकडे उंचावून एक स्वरात " गोविंदा " चा गजर होतो...!!त्या गोविंद गजराचा नाद असमंतात विरतो न विरतो, तोच पुजाऱ्यांच्या धीरगंभीर स्वरात आरती सुरु होते...पितळी थाळी वर लाकडी हतोड्याच्या प्रहारातून निर्माण होणाऱ्या नादाच्या तालावर...प्रथमारंभी श्रीगणपती पाठोपाठशक्तीरूपिणी दुर्गादेवी आणि त्रिलोकस्वामी व्यंकटेश भगवानांच्या आरती पाठोपाठ,

मुरारी जगन्नाथा नारायणा हो |

कृपासागरा अच्युता माधवा हो |

मधुसूदना श्रीधरा भाग्यवंतां |

नमस्कार हा व्यंकटेशा समर्था ||

ही नमनस्तुती, आणि नंतर....

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् |

ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:.....

ही मंत्र पुष्पांजली व श्री गणेश,श्री व्यंकटेश,श्री महालक्ष्मी व श्री गरुड भगवानांच्या चार गायत्री मंत्र व गोविंद नामाच्या गजराने हा सोहळा संपन्न होतो...

Ladies first...

च्या नियमाने प्रथम दर्शनाचा मान महिलांना..., त्यानंतर पुरुषांचे दर्शन...लक्ष्मीरूप आई भगवती पद्मावतीच्या दर्शनानंतर...स्तंभ दर्शन...तीर्थ-प्रसाद...आणि सरतेशेवटी महाप्रसादरूपी अल्पोपहार व चहापान...सारं काही यथासांग अन साग्रसंगीत...कुठेही गडबड नाही की,गोंधळ नाही...सारं काही सुनियोजित....परतीच्या प्रवासाच्या सुव्यवस्थेने बालाजी वारीची सांगता....!!

आज श्रावण महिन्याचा अन यावर्षीच्या वारीचाही शेवटचाच शुक्रवार...,म्हणजेच यंदाच्या या आनंद पर्वणीची ही शेवटची संधी...आपल्यातील बहुसंख्यांनी या वारीचा आनंद मनसोक्तपणे लुटला...ते खरेच भाग्यवान..!! ज्यांना हा आनंद घेता आला नाही,त्यांनी पुढच्या वर्षी नक्की सहभागी व्हा...!!

एकदा...फक्त एकदाच...वारी मध्ये सहभागी व्हा...पुढच्यावेळी तुम्हाला सांगायची-बोलवायची गरजच पडणार नाही... तुमचे मन...,तुमचे पाय... आणि तुमचे शरीर...        तुम्हांला स्वतःहून वारीला घेऊन जाईल...!!कारण आनंदाची अनुभूती स्वतः अनुभवल्याशिवाय त्याची महती कळत नाही...!! म्हणूनच...

प्रेम से बोलो...

जय गोविंदा......!!


दिलीप कोठावदे

पत्रकार

Comments